वाचक लिहितात   

रुग्णसेवा ही माणुसकीची सेवा

रुग्ण आणि रुग्णसेवा किंवा रुग्ण आणि डॉक्टर यांचे संबंध हे उपचार किंवा औषधापुरते मर्यादित नसतात, तर ते अत्यंत जिव्हाळ्याचे व माणुसकीचे नाते असते. कोणताही रुग्ण आपल्या डॉक्टरांना साक्षात परमेश्वराचे प्रतिरूप मानतो. या नात्याला अधिक बळकटी देण्याचे काम रुग्णालयातील आरोग्य सेवा वर्ग किंवा मदतनीस वर्ग करीत असतो. रुग्ण आणि रुग्णसेवा ही खरी माणुसकी होय. मग असे असताना काही डॉक्टर मंडळी आणि काही रुग्ण मंडळी किंवा त्यांचे नातेवाईक का चुकतात? तर हा सर्व पैशाचा खेळ असतो. डॉक्टरांनी रुग्ण सेवेनंतर वास्तववादी सेवा, गोळ्या, औषधे याच्या खर्चाचीच मागणी करावी. आगाऊ रक्कम भरा व तीही लाखात भरा ही मागणी करणे माणुसकीला पटत नाही; परंतु जी मोठी धर्मदाय नोंदणी रुग्णालये असतात, त्यांच्याकडे ठराविक निधी दान-धर्मासाठी असतो, त्याचाही विनियोग अशा प्रसंगी केला जाऊ शकतो.

धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर

अक्षय ऊर्जा स्रोतांकडे वळूया!

पृथ्वीच्या अमूल्य परिसंस्थेचे आणि मानवजातीशी असलेल्या तिच्या अतूट संबंधांचे रक्षण करण्यासाठी जगभरात अनेक जागरूकता मोहीम आणि उपक्रम राबविले जातात. या अनुषंगाने गेल्या ५५ वर्षांपासून दरवर्षी २२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा (पृथ्वी) दिन साजरा केला जातो. जगातील १७५ देशांत हा वसुंधरा दिन पाळला जातो. या उपक्रमांमध्ये वृक्षारोपण करणे, नद्यांचे जल स्वच्छ ठेवणे, प्लास्टिकच्या वापराविरुद्ध आवाज उठवणे, वन संवर्धनासाठी रॅली काढणे, कागदाचा कचरा कमी करणे, शेतीत रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक खतांचा वापर करणे इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे. धोकादायक हरितगृह वायू उत्सर्जन कमी करून पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. यंदाच्या वसुंधरा दिनाचा तोच संदेश आहे.

प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई   

हिंदी शिकण्यात गैर काय?

राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार असल्याचा निर्णय स्वागतार्हच आहे. हिंदी वर्णाक्षरे आणि लिपी पाहता हिंदी आपल्या माय मराठीची छान बहीणच शोभेल! चित्रपटांच्या आणि दूरदर्शनच्या माध्यमातून हिंदीचा प्रभाव जनमानसावर आहेच, किंबहुना लहान मुलांवर सुद्धा मोबाईलच्या माध्यमातून हिंदीचा विशेष प्रभाव आहे. अगदी निरक्षर सुद्धा संवादापुरते का होईना मोडके तोडके हिंदी सहज बोलू शकतो. एवढा हिंदी भाषेचा जनमानसावर प्रभाव आहे. आता तीच भाषा शालेय जीवनापासूनच शिकवली जाणार ही आनंदाचीच बाब म्हणावी लागेल. इंग्रजी जगाची ज्ञानभाषा असल्याने वाघिणीचे दूध समजल्या जाणार्‍या इंग्रजी माध्यमांच्या शाळांत मात्र आपल्या पाल्यांना प्रवेश मिळविण्यासाठी अहमहमिका लागते, किंबहुना ते प्रतिष्ठेचे समजले जाते, मग हिंदी शिकण्यात खळखळ कशाला? आज इंग्रजीच्या वेडाने मराठीचे काय नुकसान झाले आहे? एरव्ही जर्मन, रशियनसारख्या परकीय भाषा शिकण्यासाठी दाम मोजून आवर्जून वर्ग, शिकविण्या लावल्या जातात, मग हिंदी शालेय जीवनापासून सहज शिकायला मिळणे विद्यार्थ्यांसाठी उत्तमच नाही का? मराठीचे महत्त्व कमी करण्याचा डाव, मराठी भाषिकांच्या अस्मितेवर हल्ला, हिंदीकरणाची भीती ही ओरड सर्वथा वृथा वाटते!

श्रीकांत जाधव, अतीत (जि.सातारा) 

बदलत्या हवामानाचा फटका

जम्मू-काश्मीरसारख्या नंदनवनात निसर्गाने जो प्रकोप दाखवला तो पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी झाली. या ढगफुटीने जम्मू-काश्मीरमध्ये हाहाकार उडाला. ऐन उन्हाळ्यात निसर्गाने दाखवलेल्या या उग्र रूपाने सर्वजण आवाक झाले. कडाक्याचे ऊन, अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ या घटना वर्षभर घडत असतात. पूर्वी सर्व ऋतूंचे आगमन वेळेवर होत होते. मागील काही वर्षात ऋतुमानात मोठे बदल पाहायला मिळत आहे. ऋतुमानच बदलले आहे. पूर्वी पाऊस फक्त पावसाळ्यातच पडत असे. आता वर्षभर कुठेना कुठे पाऊस पडताना दिसतो. पावसाळ्यात दोन-दोन महिने पाऊस पडत नाही. कधीकधी दोन दिवस इतका पाऊस पडतो की, दोन दिवसात दोन महिन्याची सरासरी भरून काढतो. त्यामुळे कोणत्या ऋतूत कोणते पीक घ्यावे याबाबत शेतकरी संभ्रमात असतो. बदलत्या हवामानामुळे काहींनी शेती करणेच बंद केले आहे. वातावरणातील बदलामुळे या घटना घडत आहेत. निसर्गाच्या या बदलत्या चक्राचा मानवजातीवरच नाही, तर संपूर्ण जीवसृष्टीवरच परिणाम होत आहे. यासाठी वृक्षतोड थांबवली पाहिजे, जंगलतोड थांबवली पाहिजे. वृक्षलागवड करून ती जगवली पाहिजेत.

श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे

 

Related Articles